शिरूर, (पुणे) : शिरूर येथील कापड बाजार परिसरात असलेल्या श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याला तीन अज्ञात चोरट्यांनी लोखंडी टॉमी ने मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून मंदिरातील दानपेटीतील दोन लाख रुपये रोकड व पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) पहाटे घडली आहे.
पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे मारहाण झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मंदिराच्या देखरेखीसाठी पोपट घनवट या खासगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली असून मंदिराच्या सुरक्षा कामी रात्रपाळीस नेमणूकीस होते. मंदिराच्या मागील बाजूस पहारा देत असताना पहाटे दोनच्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने मंदिर परिसरात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला चढवत मंदिराच्या चाव्यांची मागणी केली.
चाव्या माझ्याकडे नाहीत, पुजाऱ्याकडे आहेत असं सांगताच चोरट्यांनी त्यांना लोखंडी टामी ने मारहाण करीत खाली पाडले. एका चोरट्याने त्यांच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हर रोखला व सुरक्षा रक्षक घनवट यांना हातापायाला दोऱ्याने बांधले. दोघांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा कटावणीने तोडून मंदिरात प्रवेश केला.
दरम्यान, यावेळी दानपेटीचे कुलूप व कडीकोयंडा तोडून त्यांनी पेटीतील रोकड पिशवीत भरली व गाभाऱ्यातील पद्मावती मातेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन मागील दरवाजाने पळून गेले. सदरचा प्रकार ट्रस्टीना व पोलिसांना कळवला. शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.