बारामती : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मतदार संघासोबतच उमेदवारांची सुद्धा चाचपणी होऊ लागली आहे. तर अशातच आता युगेंद्र पवार हे विधानसभेसाठी काकांच्या विरोधातच शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल, असे म्हणत त्यांनी आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करत असल्याचे बोलले जात आहे.
बारामतीसाठी एवढे काम करूनही जर येथील जनता दुसऱ्या पर्यायाचा विचार करत असेल तर बारामतीला नवा आमदार मिळायला हवा, असे विधान करून बारामती मतदारसंघातून लढावे की नाही, याबाबतची द्विधा मनस्थिती असल्याचे अजित पवार यांनी रविवारी म्हटले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एरवी बारामतीतून दीड लाखांनी निवडून येणारे अजित पवार निवडणुकीला उभे राहावे की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांना कुटुंबातूनच पुतणे युगेंद्र पवार आव्हान देऊ पाहत असल्याचे सद्याचे चित्र आहे.
शरद पवार यांचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचा इरादा
बारामती विधानसभा मतदारसंघात आज मंगळवार दि १० सप्टेंबर २०२४ पासून ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू करीत आहे. आदरणीय पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे युगेंद्र पवार यांनीयावेळी सांगितले आहे.
युगेंद्र पवार जनतेशी मुक्त संवाद करणार..
यात्रेमध्ये युगेंद्र पवार जनतेशी मुक्त संवाद करणार असल्याचे बोलले जात आहे. शरद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी मी आपल्या भेटीला येत आहे. आपणही या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हा! असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे.