उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामपंचायत उरुळी कांचन येथील सन 2024 मधील प्रलंबित असलेल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन CRS पोर्टलवर लवकरात लवकर नोंदवण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे सभापती जितेंद्र बडेकर यांनी केली. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाण्याचे संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनील सुभाष कांचन, आदि उपस्थित होते.

सन 2024 या वर्षातील अनेक नागरिकांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन पोर्टलवर प्रलंबित राहिल्याने नागरिकांना दाखले मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने थेट मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली.

उरुळी कांचन येथील सन 2024 मधील जन्म आणि मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन नसल्यामुळे शाळा प्रवेश, विमा दावे, शासकीय योजनांचे लाभ आणि वारस नोंद यांसारख्या कामांत नागरिकांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी CRS पोर्टलवरील प्रलंबित नोंदीचा प्रश्न लवकरात लवकर सोडून नागरिकांना त्वरित दाखले उपलब्ध करून दिले जातील, असे सकारात्मक आश्वासन दिले.







