पुणे : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी संख्येत कमालीची घट झाली आहे. ई-केवायसी आणि कागदपत्रांची कडक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 92 लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि सुमारे 2 कोटी 48 लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र, नव्या छाननीनंतर आता पात्र लाभार्थ्यांचा आकडा 1 कोटी 65 लाख 66 हजार 164 वर आला आहे.सरकारी निधीचा गैरवापर रोखणे आणि केवळ गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचवणे हा या पडताळणीमागचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेतील महिलांचें अनेक अर्ज बाद झाले आहेत.कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडणे.घरातील सदस्य सरकारी नोकरीत असणे किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे.बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे.अर्जातील कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे या कारणामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आगामी सणासुदीच्या आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ज्या महिलांची पडताळणी यशस्वी झाली आहे आणि ई-केवायसी पूर्ण आहे, त्यांच्याच खात्यात पुढील रक्कम जमा केली जाईल.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये या पडताळणी प्रक्रियेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.







