पुणे : पुण्यात नवीन गाडी खरेदी केल्यानंतरही ती प्रत्यक्ष घरी कधी आणायला मिळणार, याविषयी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या नोंदणीसाठी वापरली जाणारी जुनी MH-12 मालिका संपल्यामुळे प्रशासनाने MH-61 ही नवीन अंतरिम मालिका सुरू केली आहे. या नवीन प्रणालीच्या बदलामुळे सध्या वाहन नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब होत असून, ग्राहकांना आपली नवीन गाडी ताब्यात घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

पुणे RTO मध्ये दररोज सुमारे 1,600 ते 1,700 नवीन वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या पसंतीचे नंबर देण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी सर्वसामान्य वाहनांची नियमित ऑनलाइन नोंदणी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. ग्राहकांनी सर्व पैसे भरून आणि कागदपत्रे जमा करूनही नोंदणी क्रमांक मिळत नसल्याने ॲटोमोबाईल डीलर्सना वाहने ग्राहकांच्या सुपूर्द करणे शक्य होत नाहीये.

31 ऑगस्ट रोजी पसंतीच्या क्रमांकांचा लिलाव पूर्ण झाल्यानंतरच MH-61 अंतर्गत सर्वसामान्य वाहनांची नियमित नोंदणी सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष गाडी मिळण्यासाठी किमान 4 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

या नवीन मालिकेत चारचाकी वाहनांसाठी MH-61 A आणि दुचाकींसाठी MH-61 B या मालिका निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मूळ MH-12 मालिकेची नवीन प्रणाली सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुढील 1 ते 2 महिन्यांत पुन्हा MH-12 मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या श्रावण महिना, आगामी गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळी नोंदणी प्रक्रियेतील या विलंबामुळे ग्राहक आणि वाहन विक्रेते दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे.







