शिरूर : शिरूर बायपास परिसरातून कंत्राटदाराच्या मालकीचे तब्बल ७ लाख ३० हजार रुपये किमतीचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन,चार्जर व बॅटरी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी शिरूर पोलिसांनी पाच कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सनी दादा खैरे(वय २८, व्यवसाय – कंत्राटदार,रा.अटाळी आंबेवली पश्चिम,ता.कल्याण,जि. ठाणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार महेश अहिरवार,इशान अहिरवार, टिकचंद्र अहिरवार,महेश कुमार व ब्रिजेश अहिरवार(सर्व रा.वॉर्ड नं. १९,मिडावली व्हिलेज,ग्राम बलदेवगड,जि.टिकमगड,मध्य प्रदेश)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिरूर बायपास परिसरात ही घटना घडली.फिर्यादी यांच्या मालकीचे सुमारे ७ लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन,२० हजार रुपये किमतीचा चार्जर आणि १० हजार रुपये किमतीची बॅटरी,असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज संबंधित कामगारांकडे विश्वासाने सोपविण्यात आला होता.

मात्र,संबंधित कामगारांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने सदर ऐवज चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी २९ ऑगस्ट रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, चोरीस गेलेला मुद्देमालही अद्याप पर्यंत मिळालेला नाही.त्यामुळे शिरूर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करीत आहेत.







