पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासवरील (बाह्यवळण) अनधिकृतपणे फोडण्यात आलेले दुभाजक प्रशासनाकडून तातडीने कारवाई करत कायमस्वरूपी बंद करण्याचे काम सुरु झाल्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

‘शिरुर बायपास (बाह्यवळण) वरील अनधिकृत दुभाजक बनले मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली पुणे प्राईम न्यूज मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले, बांधकाम विभागाने शिरुर बायपास ते श्री गणेशा हॉस्पिटल चौक येथील अनधिकृत दुभाजक तात्काळ सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने पक्के बांधकाम करुन कायमस्वरूपी बंद करण्याचे काम सुरु केले आहे.

या महामार्गावरील हॉटेल संग्रामजवळ अनधिकृतपणे तोडलेल्या दुभाजकाजवळून अहिल्यानगरच्या दिशेने वळण घेणाऱ्या एका चारचाकी वाहनाला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली असता या वाहनासह एका दुचाकीस्वाराला पुण्यावरून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने मंगळवारी,दि.११ सायंकाळी जोरदार धडक दिली असता या अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश लाड व चारचाकी वाहनामधील युवा उद्योजक किशोर यादव यांचा मृत्यू झाल्यानंतर बायपासवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
बायपासवरील अनधिकृत फोडण्यात आलेले दुभाजक तातडीने बुजविण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज,शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक अमित कर्डीले व उमेश शेळके यांसह स्थानिक पदाधिकार्यांनी तातडीने पावले उचलत यासाठी संबंधित विभागाकडे तातडीने पाठपुरावा केला.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर खडबडून जागे आले.
शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिस पथकासह संपूर्ण बायपास रस्त्याची पाहणी करुन वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी गंगा पेट्रोल पंपाजवळील आणि श्री गणेशा हॉस्पिटल चौकाजवळील दुभाजक बॅरिकेटस लावून तात्काळ बंद केले आहे.हे दुभाजक सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
शिरुर बायपासवरील तीनही धोकादायक दुभाजक बॅरिकेटस लावून बंद करण्यात आल्यामुळे अनधिकृतपणे रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना आळा बसणार आहे.बायपासवर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून, वाहतूक पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असल्याचे शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.







