नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील माता साहिब गुरुद्वारात हल्ला झाल्याची घटना घडली. गुरुद्वारातून दर्शन घेऊन बाहेर पडत असताना एका 62 वर्षीय सेवादाराने खंजरने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जसपाल सिंग याने बादल यांच्यावर पहिला वार केला. हा वार त्यांच्या हाताला लागला. त्यानंतर आरोपीने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले नांदेड पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी तातडीने मध्ये येत बादल यांचा बचाव केला.

दुसरा वार अडवताना केंद्रे यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या या तत्परतेमुळे बादल यांच्यावर पुन्हा हल्ला होण्यापासून बचाव झाला. बादल यांना Z Plus सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक तैनात होते. जखमी सुखबीर सिंह बादल आणि पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्ल्याच्या वेळी बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल देखील गुरुद्वारात उपस्थित होत्या. त्यांनी संपूर्ण घटना पाहिली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमी पोलिस निरीक्षक केंद्रे यांची भेट घेतली. त्यांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करत हरसिमरत कौर यांनी त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना रोख बक्षीस दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी हरसिमरत कौर बादल यांच्याशीही संवाद साधून सुखबीर बादल यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.







