पुणे: पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात पिस्तूल हाताळताना अचानक चाप दाबला गेल्याने गोळी सुटून तरुणाच्या मांडीत शिरल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी तरुणाला त्याच्या साथीदाराने तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पिस्तूल बाळगणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, तिघांविरुद्ध आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश दादासो मोरे (वय १९, रा. दत्तनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सनी ऊर्फ संदीप सुभाष दीपक (वय ३०, रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) हा या घटनेत जखमी झाला आहे. आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौकात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हा), सनी दीपक आणि अविनाश मोरे हे तिघे मध्यरात्री साई सिद्धी चौक परिसरात एकत्र आले होते. यावेळी संकेत चोरघे याने त्याच्याकडे असलेले पिस्तूल इतरांना दाखवले. त्यानंतर अविनाश मोरे याने पिस्तूल हातात घेऊन पाहिले. पुढे सनी दीपक याने पिस्तूल हाताळताना अचानक त्याचा चाप दाबला गेला.

चाप दाबला जाताच पिस्तूलातून गोळी सुटली आणि ती सनीच्या मांडीत घुसली. गोळीबार होताच संकेत चोरघे घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, अविनाश मोरे याने जखमी अवस्थेतील सनीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून भारती विद्यापीठ पोलिसांना गोळीबारात तरुण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी सनीकडे चौकशी केली. त्यानंतर पिस्तूल हाताळताना गोळी सुटल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी अविनाश मोरे याला अटक केली असून संकेत चोरघे याच्यासह सनी दीपक आणि अविनाश मोरे यांच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत चोरघे हा यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांत अडकलेला आहे. खंडणी विरोधी पथकाने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याला आर्म्स अॅक्टअंतर्गत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनीही पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली होती.
या घटनेनंतर पसार झालेल्या संकेत चोरघेचा पोलीस शोध घेत आहेत. पिस्तूल त्याच्याकडे कसे आले, त्याने ते कुठून आणले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.






