लोणी काळभोर, (पुणे) : केवळ एक मिनिट उशीर झाला म्हणून तब्बल 125 ते 150 निष्पाप विद्यार्थी तासनतास शाळेच्या गेटबाहेर उन्हात ताटकळत उभे ठेवण्याचा धक्कादायक आणि मनमानी प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये (VGS) हा प्रकार घडला असून शाळेच्या या जाचक नियमांमुळे आणि कठोर शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची भीती पसरली असून, त्रस्त पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना या मनमानी आणि माजोऱ्या कारभाराची पोलखोल केली.

याबाबत आपली व्यथा मांडताना पालक पूजा चौधरी यांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सांगीतले की, त्यांचा मुलगा गेल्या 8 वर्षांपासून एमआयटी स्कूलमध्ये शिकत आहे. नायगाव परिसरातून सुमारे 15 किलोमीटरचा खडतर प्रवास करून, रेल्वे गेट व थेऊर फाटा येथील भीषण वाहतूक कोंडीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पोहोचावे लागते.

शाळेने गेल्या काही वर्षांत बस सेवा बंद केल्याने पालकांना खाजगी वाहनांची सोय करावी लागली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी गेट बंद करण्याची वेळ निश्चित असतानाही, शाळा प्रशासनाने साडेआठ वाजताच मुख्य प्रवेशद्वार बंद केले. अवघ्या 1 मिनिटाच्या उशिरासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 1तास शाळेच्या गेटबाहेर उभं राहण्याची अत्यंत कठोर व मानहानीकारक शिक्षा देण्यात आली.

“अपघात झाला तर मुख्याध्यापिका जबाबदारी घेणार का?”
शाळेच्या या आडमुठ्या धोरणामुळे लहान मुलांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. उशीर होईल या भीतीने मुले सकाळी घाईघाईत न खाता-पिता घराबाहेर पडत आहेत. “शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी जर वाहनचालकाने गाडी वेगाने पळवली आणि काही अपघात घडला, तर त्याची जबाबदारी प्रिन्सिपल मॅडम घेणार का?” उरुळी कांचन-लोणी काळभोर परिसरातील पालकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शाळा प्रशासनाने असल्या अमानुष आणि कडक नियमांमध्ये तत्काळ सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
याबाबत बोलताना पालक तुकाराम सुरवसे म्हणाले, “प्रयागधाम येथून माझी दोन मुळेदररोज या ठिकाणी शिकण्यासाठी येतात. रेल्वेगेटमुळे आम्हाला तुमची मुले आम्हाला आणता येणार नाहीत असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही खासगी बस करून आमची मुले शाळेत पाठवत आहोत. बुधवारी सकाळी एक मिनिट उशीर झाला तर एक तासभर बाहेर उभे केले. मात्र शाळेच्या बसेस दुसऱ्या बाजूने आत सोडल्या. लाखो रुपये भरूनही आमच्या मुलाना त्रास होत असेल तर हे चुकीचे आहे
याबाबत बोलताना योगेश चौधरी म्हणाले, “पाऊस ट्राफिक व मुलाची गर्दी यामुळे शाळेत येण्यासाठी फक्त एक मिनिट उशीर झाला. यामध्ये उशीर झाला. आमच्या रोडने येताना रेल्वे ओलांडून यावे लागते. गेटवर 100 ते 150 मुले गेटच्या बाहेर उभी केली होती. प्राचार्यांना भेटायला जायचे होते मात्र भेटून दिले जात नाही. अशी हुकुमशाही एमआयटी शाळा करीत आहे. त्याच्या बसेस लेट झाल्या तर त्यांना आत सोडले जाते मग खासगी बस ला जाणून बुजून त्रास दिला जात आहे.






