उरुळी कांचन, (पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) स्पष्ट नोटीस आणि काम थांबवण्याचे निर्देश असतानाही, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गट क्रमांक 832 मध्ये अनधिकृत बांधकाम सर्रासपणे सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. “शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून हे बेकायदा काम सुरू असल्याने पीएमआरडीएचे संबंधित अधिकारी विकासकाशी संगनमत करून ‘मॅनेज’ झाले आहेत का?” असा थेट व गंभीर आरोप झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या शिष्टमंडळाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील गट क्र./सर्व्हे क्र. 832 मधील सुमारे अडीच गुंठे जागेत जगन्नाथ राजाराम बुरकुले यांच्याकडून अंदाजे 40 RK (रूम-किचन) खोल्यांचे अत्यंत अनधिकृत व धोकादायक पद्धतीने बांधकाम चालवले जात आहे. या बेकायदा बांधकामाविरोधात अर्जदार बापूसाहेब साहेबराव कांचन (रा. उरुळी कांचन) यांनी 20 जुलै 2025 रोजी पीएमआरडीए आयुक्त कार्यालयाकडे पुन्हा एकदा लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर प्रशासनाने नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस मिळूनही प्रत्यक्ष जागेवर बांधकामाचा हातोडा पडण्याऐवजी काम वेगाने सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. 17) गट क्र. 832 मधील घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नोटीसनंतरही काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली आणि पुणे प्राधिकरण विभागाकडे तक्रार नोंदवून सदर अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची जोरदार मागणी केली.

दरम्यान, यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, राज्य संघटक आबासाहेब चव्हाण, शहर अध्यक्षा वंदना पवार, जिल्हा अध्यक्षा वैशाली अवघडे, नानासाहेब थोरात, चंद्रकांत कांबळे, अरुण अवघड आणि तक्रारदार बापूसाहेब कांचन यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







