लोणी काळभोर, ता. २३ : पुणे शहरात अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत असल्याचे चित्र असताना, मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र मटका, अवैध दारू विक्री, गांजा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. परिसरातील अनेक भागांत खुलेआम सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यामुळे मांजरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मांजरी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत मंदिराच्या जवळ एक दारू विक्रेता अनेक वर्षापासून ‘ढेकणा’सारखा चिकटून बसला असून खुलेआम अवैध हातभट्टी विक्री करत आहे. केशवनगर रोड परिसरात एका मटकाकिंगने थैमान घातल्याची चर्चा आहे. या मटक्याच्या धंद्यात त्याने ‘अतुल’नीय कामगिरी केली असून आता त्याचे अवैध कृत्यांचे ‘घाडगे’ भरले आहे. तर एकाने गांजा विक्रीत महारथ मिळवली असून त्याने ‘सोन्यावाणी’ पैसा कमावल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
काही ठिकाणी मटका व्यवसाय उघडपणे सुरू असून, अवैध दारू विक्री आणि गांज्याची तस्करीदेखील वाढली आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या अवैध धंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“पोलीस नेमकं करतात तरी काय?”, “अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत?”, असे सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत. काही नागरिकांनी तर अवैध धंद्यांना स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी गुटखा आणि तंबाखू विक्रीही सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच काही भंगार व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा रंगली आहे. हे अवैध धंदे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करून या व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पुणे शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कारवाईचा बडगा उगारणार का, की नेहमीप्रमाणे संबंधितांना पाठीशी घातले जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







