पुणे: पुणे-सासवड मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहतूक विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे मंगळवारी (28 जुलै) काही काळासाठी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कामादरम्यान नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दिवे घाटातील रस्ता अधिक सुरक्षित आणि रुंद करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून डोंगर परिसरातील कठीण भाग हटवण्यासाठी नियंत्रित स्फोटकांचा वापर केला जात आहे. स्फोटाच्या वेळी वाहनांची वर्दळ सुरू राहिल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्पुरता वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते 2 या कालावधीत दिवे घाटातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.

वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांनी या वेळेत कोंढवा येथील बोपदेव घाट मार्गाचा वापर करून पुणे आणि सासवडदरम्यान प्रवास करावा, अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिवे घाट मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बंदीची वेळ लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






