पुणे : प्रेमसंबंधातून एखादी व्यक्ती किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. विवाहित प्रेयसीला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी एका प्रियकराने तिच्या पतीची रिक्षाच चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीचा रोजगार बंद झाला, तर तो आर्थिक अडचणींमुळे पत्नीला सोडून जाईल आणि आपला मार्ग मोकळा होईल, असा विचार आरोपीने केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडली. या प्रकरणात मुकेश सीताराम पवार (वय 36) असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीची रिक्षा चोरल्याचा आरोप आहे.

शिरोले रोडवरील दत्त वसाहतीत राहणारे सुभाष शंकरराव पासलकर (वय 45) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीशी वाद सुरू होते. याच काळात त्यांच्या पत्नीचे मुकेश पवार याच्याशी प्रेमसंबंध जुळल्याची माहिती समोर आली. पतीसोबत होणाऱ्या वादांची माहिती महिला प्रियकराला देत असल्याचेही सांगितले जात आहे.

या परिस्थितीत मुकेशने प्रेयसीला स्वतःसोबत ठेवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडल्याचा आरोप आहे. तिच्या पतीच्या उत्पन्नाचे साधन असलेली रिक्षा चोरीला गेली, तर त्याची आर्थिक परिस्थिती बिघडेल आणि तो पत्नीपासून दूर होईल, असा त्याचा अंदाज होता. याच विचारातून त्याने साथीदारांच्या मदतीने रिक्षा चोरल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, रिक्षा चोरीला गेल्यानंतर सुभाष पासलकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून या प्रकरणातील कथित कट उघडकीस आणला. प्रेमसंबंधातून रिक्षाच चोरी करण्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.







