उरुळी कांचन : नागरीकांनी स्वच्छतेची कर्तव्यता पार पाडली तर स्वच्छतेच्या प्रश्नावर आपण मात करु शकतो. शासन स्वच्छतेच्या बाबत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत आहेत. कचरा कमी कसा होईल याच्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील निसर्ग आश्रम येथे बुधवारी (ता. 18) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते स्वच्छता अभियात सहभाग घेऊन करण्यात आला. यावेळी दिवसे बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, हवेलीचे गट विकास अधिकारी भूषण जोशी, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीकक्षक शंकर पाटील, उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, उपसरपंच सिमा कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी पंचायत समिती उपसभापती हेमलता बडेकर, युवा नेते अजिंक्य कांचन, सदस्य शंकर बडेकर, सुनील तांबे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, भाऊसाहेब तुपे, आदि ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यापुढे बोलताना जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, “स्वच्छता चळवळ ही सामुहिक जबाबदारी आहे. या चळवळीत स्वच्छतेचे देशहिताचे भरीव कार्य होत आहे. विदेशाच्या धर्तीवर आपणही स्वच्छता कार्यात कचरा संकलन , विघटन व प्रक्रिया संदर्भात कार्य करीत आहे. जिल्ह्यास्तरावर जिल्हा नियोजन समितीत स्वच्छतेच्या खर्चावर अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कचरा संकलनासह कचरा निर्मूलनास अधिनुक प्रकल्पाची मदत मिळत आहे. ग्रामपंचायतींनी अशा सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.”
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले, “भविष्यातील कचरा विघटनासाठी चांगल्या प्रतीचा प्लांट बसविण्यात येणार आहे. तसेच ओढ्यावरील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट इंस्टाल करण्यात येईल. कचर्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उरुळी कांचन (ता. हवेली) येथे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच उभारण्यात येईल.”
दरम्यान, माजी सरपंच संतोष कांचन यांनी प्र्स्ताविकात सांगितले की, उरुळी कांचन व परिसरात कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. यासाठी उरुळी कांचनला कचरा विघटनासाठी चांगल्या प्रतीच्या प्लांटची मागणी केली होती. कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते उरुळी कांचन शहरात ग्रामस्वच्छतेचे कार्य करणाऱ्या उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी यांचा जिल्हाधिकारी दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.