पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेने हादरलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली यांच्या पश्चात दोन लहान मुली आहेत. काही दिवसांपूर्वी वडिलांचा आधार गमावल्यानंतर आता आईचेही निधन झाल्याने दोन्ही मुलींवर मोठे संकट आले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

8 जुलै रोजी मोशी परिसरातील कचरा डेपोच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली होती. कचऱ्याचा मोठा ढिगारा जवळील इमारतीवर कोसळल्याने अनेक कर्मचारी त्याखाली अडकले होते. बचावकार्य राबवूनही 9 कर्मचाऱ्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यामध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता.

पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर सोनाली गायकवाड यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला होता. कुटुंबातील व्यक्ती आणि परिचितांकडून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, बुधवारी रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.







