पुणे : गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी नीलेश घायवळ टोळीवर दोन स्वतंत्र मोक्का कारवाया करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या शार्प शूटरसह दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड) आणि विपुल उत्तम माझिरे (वय ३०, रा. रावडे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विपुल माझिरे हा शार्प शूटर म्हणून ओळखला जातो.

पोलिसांच्या माहितीनुसार, नीलेश घायवळने आपल्या टोळीतील गुंडांना टोळीचे वर्चस्व वाढवण्यास सांगितले होते. त्यातून सप्टेंबर २०२५ मध्ये टोळीतील गुंडांनी एका तरुणावर गोळीबार करून त्याला जखमी केले होते. तसेच दुसऱ्या व्यक्तीवर वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता.

या दोन्ही प्रकरणांमध्ये घायवळ टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून, कोथरूड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस हवालदार लांडगे यांना संतोष धुमाळ हा पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाण परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुलमोहर सोसायटी परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी सोसायटीच्या प्रवेश-निर्गमन मार्गांवर तसेच लिफ्टजवळ पथके तैनात केली. एका फ्लॅटची तपासणी सुरू असताना संतोष धुमाळ पोलिसांच्या नजरेस पडला. त्याने खिडकीतून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले.
धुमाळची चौकशी केली असता त्याने विपुल माझिरे हा त्याला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले दुकानाच्या मागे येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळाने विपुल माझिरे तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे घायवळ टोळीतील फरार आरोपींविरोधातील पोलिसांची कारवाई आणखी तीव्र झाली आहे. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.






