कोल्हापूर : चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हुपरी-पट्टणकोडोली मार्गावर घडली. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास तळंदगे फाट्याजवळ हा प्रकार घडला. सुजाता श्रीशैल्य पुजारी (वय 30, रा. गणेश माळ, हुपरी) या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशैल गुरव हा मूळचा कर्नाटकातील रहिवासी असून, तो पत्नी आणि दोन मुलांसह तीन महिन्यांपूर्वी हुपरीतील गणेशमाळ परिसरात भाड्याच्या घरात राहण्यास आला होता. बुधवारी तो पत्नी सुजाताला सोबत घेऊन मोपेडवरून पट्टणकोडोलीच्या दिशेने जात होता. तळंदगे फाट्याजवळ दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर श्रीशैलने रस्त्यावरच पत्नीला मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पतीच्या मारहाणीपासून बचाव करण्यासाठी सुजाता जवळच्या हॉटेलच्या दिशेने धावत गेल्या. मात्र, श्रीशैलने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर त्याने कटरसारख्या धारदार शस्त्राने सुजाताच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुजाता यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नागरिकांवरही धावून जाण्याचा प्रयत्न केला.

नागरिक जमा होत असल्याचे पाहून श्रीशैलने हत्यार घटनास्थळी टाकले आणि मोपेडवरून पसार झाला. गंभीर जखमी सुजाताला नागरिकांनी तातडीने पट्टणकोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी हल्लेखोर पतीचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी कर्नाटकात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून, हल्ल्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.







