बारामती: बारामती शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेले तीन संशयित पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना प्रदीप नकाते हा कमरेला पिस्तूल घेऊन काही साथीदारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या साथीदारांकडेही घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तपास पथकाने माहितीची खातरजमा करून सापळा रचला.

पोलिसांच्या पथकाने नकातेच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान तिघे पसार
पोलिसांची कारवाई सुरू असताना नकाते याच्यासोबत असलेले अजय नंदकुमार सकट, रोहित अशोक सोनवणे आणि गणेश पाठक हे तिघे पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. हे तिघे कोणत्या कारणासाठी एकत्र आले होते, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची शस्त्रे होती आणि ते एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नकातेवर यापूर्वीही शस्त्र बाळगल्याचा गुन्हा
प्रदीप नकाते याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा पिस्तूल आढळल्याने पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसह शस्त्र कोठून मिळाले, याचा तपास सुरू केला आहे.
शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड होण्याची शक्यता
पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मागील तीन वर्षांत त्यांच्या माहितीच्या आधारे बारामती शहर पोलिसांनी सहा अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. नकातेला पिस्तूल कोणी पुरवले, त्यामागे कोणाचा सहभाग आहे आणि फरार संशयितांचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय, याचा तपास सुरू आहे. या तपासातून बेकायदेशीर शस्त्रपुरवठ्याची साखळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करीत आहेत.






