राहुलकुमार अवचट

यवत: लातूरहून रुग्णाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. केडगाव हद्दीतील व्यंकटेश पेट्रोलपंपासमोर रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७, रा. १२ नंबर पाटी, मांजरा, ता. लातूर) याचा येडशी, ता. धाराशिव येथे अपघात झाला होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एमएच २४ डीडब्ल्यू २६९३ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने केडगाव गावच्या हद्दीतील व्यंकटेश पेट्रोलपंपासमोर उभ्या असलेल्या एमएच २३ एयू १८१७ क्रमांकाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की रुग्णवाहिकेच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिसांसह श्री दत्त ॲम्बुलन्सचे चालक समीर अन्सारी आणि विष्णू राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने यवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात रुग्णवाहिकेत समोर बसलेले शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत असलेला देवानंद मुधोळकर यांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालक ओंकार अंतराम कणसे, आशाबाई सुरेश मुधोळकर आणि सचिन सुरेश मुधोळकर हे तिघे जखमी झाले आहेत.
चालक मोबाईलवर व्हिडिओ पाहत असल्याचा आरोप
या प्रकरणी सचिन मुधोळकर यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रुग्णवाहिका चालक ओंकार कणसे हा लातूरहून निघाल्यापासून मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत वाहन चालवत होता. रुग्णाला त्रास होत असल्याने वाहन सावकाश चालवावे आणि मोबाईल पाहू नये, असे चार ते पाच वेळा सांगूनही चालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
भरधाव वेगाने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला रुग्णवाहिकेने पाठीमागून धडक दिली आणि त्यात आजोबा शेटीबा मुधोळकर व देवानंद मुधोळकर यांच्या मृत्यूस चालक कारणीभूत ठरल्याचा आरोप सचिन मुधोळकर यांनी केला आहे.
याप्रकरणी रुग्णवाहिका चालक ओंकार अंतराम कणसे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वागज करीत आहेत.







