लोणी काळभोर, ता. 16 : रुग्णवाहिकेत केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात रविवारी (ता. 16) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्नेहल मलमे (वय अंदाजे 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल ही वाकवस्ती परिसरातील सागर पोपट तावरे यांच्या खोलीत भाड्याने राहत होती. ती रुग्णवाहिकेत केअरटेकर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
रविवारी दुपारी स्नेहलने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार बनकर आणि पोलीस अंमलदार अरुण थोरबोले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पुणे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, स्नेहलने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तिच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.








