शिरूर: अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गावर शिरूर शहर परिसरातील व्हिजन इंटरनॅशनल शाळेजवळ आज (ता. १६) रविवारी दुपारी भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय युवक दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला. या अपघातात सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३०, रा. बोऱ्हाडमळा-शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आठवडाभरात याच परिसरात तिसरा अपघाती मृत्यू झाल्यामुळे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ बोऱ्हाडे हे रविवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गाने जात होते. बाबुरावनगर येथील व्हिजन इंटरनॅशनल शाळेच्या पुढे पुलाजवळ पोहोचले असता, मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बोऱ्हाडे हे जोरदारपणे रस्त्यावर फेकले गेले. याप्रसंगी अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा अपघात खूप भीषण होता. असे घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त युवक बोऱ्हाडे यांना तातडीने मदत करून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बोऱ्हाडमळा तसेच शिरूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.







