पुणे: गुलटेकडी परिसरातील एका शाळेत 11 वर्षीय विद्यार्थ्याला पीटीच्या तासात शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मित्राशी बोलत असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याच्या उजव्या हातावर शिक्षकाने जोरात मारल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, संबंधित पीटी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 21 ऑगस्ट रोजी शाळेच्या वेळेत घडल्याची माहिती आहे. पीटीचा तास सुरू असताना विद्यार्थी आपल्या मित्रासोबत बोलत होता. त्यावेळी पीटी शिक्षक मुजाहिद यांच्या लक्षात ही बाब आली. विद्यार्थ्याचे मित्राशी बोलणे शिक्षकाला पसंत पडले नाही. त्यानंतर शिक्षकाने रागाच्या भरात विद्यार्थ्याच्या उजव्या हातावर मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षकाच्या मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी गेला. घरी पोहोचल्यानंतर त्याने आईला शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मुलाच्या हाताला झालेली दुखापत पाहून आईने तातडीने याबाबत कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर विद्यार्थ्याच्या आईने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पीटी शिक्षक मुजाहिद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलिसांकडून केला जात आहे.







