पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर धावत्या आलिशान कारची नंबरप्लेट अचानक गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आरटीओने संबंधित कारचा शोध घेतला. मात्र, नंबरप्लेट आतून यांत्रिक पद्धतीने लपविण्याची व्यवस्था केल्याचे समोर आल्यानंतरही चालकावर केवळ ४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याने आरटीओच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

८ सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई महामार्गावर एक आलिशान कार वेगाने जात असताना तिची नंबरप्लेट अचानक गायब झाल्याचे दिसून आले. कारमधूनच यांत्रिक यंत्रणेच्या मदतीने नंबरप्लेट आतमध्ये लपविण्यात आल्याचा प्रकार मागून येणाऱ्या वाहनचालकाने मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरटीओ प्रशासनाचे लक्ष या प्रकाराकडे गेले.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड आरटीओच्या भरारी पथकाने संबंधित कारचा शोध घेतला. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मॉडिफाय केलेली यांत्रिक नंबरप्लेट असल्याचे आढळले. भरारी पथकाने ही यंत्रणा काढून टाकत वाहनमालकाकडून ४,५०० रुपयांचा दंड वसूल केला.

मात्र, नंबरप्लेट जाणूनबुजून लपविण्यासाठी वाहनात केलेला बदल गंभीर स्वरूपाचा असल्याचे मानले जात असताना केवळ दंडाची कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे नंबरप्लेट लपविणाऱ्या वाहनाचा वापर एखाद्या गुन्ह्यात किंवा अपघातात झाला असल्यास त्याचा माग काढणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रकरण दंडापुरतेच मर्यादित का ठेवण्यात आले, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित वाहनचालकाचे नाव आणि ओळख जाहीर करण्यास आरटीओ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यानेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले की, ई-चालानचा दंड टाळण्यासाठी वाहनमालकाने ही यांत्रिक नंबरप्लेट बसवल्याचे सांगितले आहे. भरारी पथकाने ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करून यांत्रिक नंबरप्लेट काढून टाकली आहे. आता या कारवाईवर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.






