पुणे : मैत्रिणीशी संवाद साधल्याच्या रागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पेरूगेट पोलीस चौकीच्या हद्दीत घडली. ‘डायल ११२’ वर माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या ५३ मिनिटांत तरुणाचा पाठलाग करून त्याची सुखरूप सुटका केली. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे अपहरणातून सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून (एमएच १२ ९६९६) एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची माहिती आपत्कालीन क्रमांक ११२ वर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित परिसरात गस्त वाढवून नाकाबंदी सुरू केली आणि संशयित वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी वाहनाचा माग काढत सिंहगड रस्त्याच्या परिसरात त्याला अडवले. रात्री सुमारे १.२३ वाजता पोलिसांनी कारवाई करून प्रसाद सूर्यवंशी याची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. यावेळी सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर, व्यवसाय हॉटेल व्यावसायिक) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, माळशिरस, सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक तपासानुसार, प्रसाद आणि संशयित आरोपी सागरची मैत्रीण दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. प्रसाद हा संबंधित तरुणीच्या संपर्कात असल्याने सागरच्या मनात त्याच्याबद्दल राग होता. याच कारणातून सागरने साथीदारांसह प्रसादला मारहाण करून त्याच्याच वाहनातून जबरदस्तीने नेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सुटकेनंतर प्रसादची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात एकूण चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.







