शिरूर: मर्यादेपेक्षा अधिक आवाज हा मानवी मेंदू,कान,डोळे तसेच शरीरासाठी त्रासदायक ठरतो.डीजेच्या वाढत्या आवाजाचा परिणाम भविष्यातील पिढ्यांवरही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळून गणेशोत्सव आनंदाने, उत्साहाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा,असे आवाहन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी केले.

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ९) शिरूर शहर व तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी,नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची संयुक्त बैठक शिरूर नगरपरिषदेच्या स्व.रसिकभाऊ धारीवाल सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गिल्ल बोलत होते.

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून,डीजेच्या माध्यमातून ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे गिल्ल यांनी स्पष्ट केले. डीजेच्या आवाजाची ध्वनी मर्यादा ही मोजली जाणार आहे.त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील,असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.यामुळे गणेशोत्सवात डीजेचा अतिवापर करणाऱ्या गणेश मंडळांना अमर्यादित डीजेचा वापर चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळांच्या सहकार्याने शिरूर शहर व परिसरात सुमारे 6 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, वृक्षलागवडीसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले.गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्सव ठरावा.यासाठी प्रशासन,गणेश मंडळे आणि नागरिकांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष मितेश गादिया,नगरसेवक उमेश शेळके, सुनील जाधव,प्रा.चंद्रकांत धापटे, पत्रकार बाळासाहेब ढोबळे, प्रा. सतीश धुमाळ,रवींद्र सानप, ॲड. बाबुराव पाचंगे,मेहबूब शेख, अविनाश घोगरे यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे,शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील,पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड,महिला दक्षता कमिटीच्या पदाधिकारी व तालुक्यातून मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत दिवटे यांनी मानले.






