पुणे : मराठा आणि कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. या आंदोलनात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सुरुवातीला वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला होता. मात्र, सरकारच्या विनंतीनंतर त्यांनी सलाइन लावून उपचार घेण्यास संमती दिली आहे. आता मराठा आरक्षणाच्या लढ्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची एंट्री झाली आहे.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर आणि मराठा आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझी प्रकृती आता उत्तम आहे आणि डॉक्टरांनी योग्य ते उपचार केले,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या अनुभवाचा दाखला दिला. आपल्या आयुष्यातील उपोषणांचे महत्त्व पटवून देताना अण्णा हजारे म्हणाले, “मी माझ्या जीवनकाळात एकूण 22 वेळा उपोषणे केली असून, उपोषण केल्याने आरोग्य सुदृढ राहते. आत्मक्लेश आणि उपोषण हे नेहमी समाज व देशाच्या हितासाठीच असले पाहिजे. मी केलेल्या उपोषणांच्या बळावर आतापर्यंत 10 महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेण्यात यश आले आहे.” या अनुभवाच्या आधारे त्यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनाबाबत महत्त्वाचा सल्लाही दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या सलग 13 दिवस चाललेल्या या उपोषणामुळे त्यांच्या वजनात लक्षणीय घट झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.

या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.






