पुणे: पुण्यात सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल १८ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमचा गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचे पथक तुम्हाला अटक करण्यासाठी येत असल्याची भीती दाखवण्यात आली. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर मोठी रक्कम ऑनलाइन पाठवली.

साळुंखे विहार परिसरात हा प्रकार घडला. शीला रुई लोबो (वय ८३, रा. साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अग्रहारी कन्स्ट्रक्शनच्या बँक खातेदारासह दोन अज्ञात मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान लोबो यांना अनोळखी व्यक्तींचे फोन आले. त्यांच्या बँक खात्यातून संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊन अटक होऊ शकते, अशी भीती आरोपींनी निर्माण केली. त्यानंतर खात्याची कायदेशीर पडताळणी करण्याच्या नावाखाली तपास पूर्ण होईपर्यंत पैसे एका ‘सुरक्षित’ बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.

अटकेच्या भीतीमुळे लोबो यांनी आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि वेगवेगळ्या टप्प्यांत तब्बल १८ लाख ५ हजार रुपये ऑनलाइन वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोबो यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, पोलिस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून डिजिटल अरेस्टची धमकी देत नाही किंवा तपासाच्या नावाखाली नागरिकांना पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यास सांगत नाही. असा संशयास्पद फोन आल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच सायबर फसवणूक झाल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर त्वरित संपर्क करणे महत्त्वाचे आहे.






