पुणे, ता. 10 : उधारीचे अवघे 600 रुपये परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने मित्राच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात 8 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. राहुल राजेंद्र जवंजाळ (वय 22) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी आशीष डेव्हीड मगर (वय 27, रा. येरवडा) याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103′(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधून चंदननगर पोलिसांना राहुल जवंजाळ याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. राहुलच्या छातीच्या डाव्या बाजूला धारदार वस्तूने गंभीर जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. प्राथमिक चौकशीत राहुलचा मित्र आशीष मगर याने राहुल स्वतः घरातील चाकूने जखमी झाल्याचे सांगितले. राहुलने फोन करून ‘मला लागले आहे’ असे सांगितल्याने आपण त्याच्या खोलीखाली गेलो आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेल्याचा दावा आशीषने पोलिसांकडे केला होता.

मात्र, घटनास्थळी रक्ताचे डाग आढळणे, चाकू, रक्ताने माखलेला टॉवेल व ब्लँकेटचा तुकडा मिळणे आणि आशीषच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने विविध नमुने व मुद्देमाल जप्त केला. राहुलला रुग्णालयात नेण्यासाठी वापरलेली अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आशीष मगर याची पुन्हा कसून चौकशी केली असता त्याने घटनेबाबत वेगळी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आशीषच्या कथित कबुलीनुसार, राहुलने त्याच्याकडून घेतलेले 600 रुपये वेळेत परत केले नव्हते. त्यामुळे 8 सप्टेंबर रोजी त्याने राहुलला अनेक वेळा फोन केला. मात्र, राहुलने प्रतिसाद न दिल्याने आशीष सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्या खोलीवर गेला. तेथे दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला.
यावेळी राहुलने घरातील चाकू हातात देत ‘हातसे क्यो मारता है, चाकुसे मार’ असे म्हटल्याचे आशीषने पोलिसांना सांगितले. त्यानंतर राहुलने आई-वडिलांवरून शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात आशीषने राहुलच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकू भोसकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
चाकूचा वार झाल्यानंतर राहुलच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. घाबरलेल्या आशीषने टॉवेलने जखम दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुलला इमारतीखाली आणून अॅक्टिव्हावर बसवून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर राहुल बेशुद्ध होऊन दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातून त्याला प्रथम निरामय हॉस्पिटल आणि त्यानंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालामुळे संशयाला बळ
राहुलच्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू छातीच्या डाव्या बाजूला झालेल्या चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. घटनास्थळी मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे, आशीषच्या चौकशीत समोर आलेली माहिती आणि शवविच्छेदन अहवाल यामुळे राहुलने आत्महत्या केल्याचा सुरुवातीचा दावा संशयास्पद ठरला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आशीष डेव्हीड मगर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






