पुणे, ता. 10 : खराडी परिसरात वैद्यकीय परिषदेकडे वैध नोंदणी नसतानाही स्वतःच्या नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावून वैद्यकीय व्यवसाय केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धीरज दिलीप येवले (वय 29, रा. चाळीसगाव, जळगाव) याच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजवनकर यांच्या तक्रारीनुसार, येवले हा बीएएमएसचे शिक्षण घेत असून त्याची वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसल्याचे तपासणीत आढळले. खराडीतील श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिकच्या फलकावर डॉक्टर म्हणून उल्लेख करून तो वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचा आरोप आहे. तसेच विश्रांतवाडी येथील कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी करताना त्याने सादर केलेल्या वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्रावरील क्रमांक दुसऱ्या डॉक्टरच्या नावावर असल्याचे तपासणीत आढळल्याचा महापालिकेचा दावा आहे.

महापालिकेच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीच्या तपासणीनंतर विधी विभागाच्या अभिप्रायानुसार ही तक्रार करण्यात आली. येवले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (2) तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यान्वये कारवाईची मागणी करण्यात आली असून, पुढील तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.








