पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तहसील कार्यालयाच्या परिसरात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे सुनील खराडे हे मजूर म्हणून काम करतात. बुधवारी, २२ जुलै रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास त्यांची पत्नी घराबाहेर कपडे धुण्याचे काम करत होती. त्यावेळी त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा नवीन हा घरात गाढ झोपला होता. काही मिनिटांतच एका भटक्या कुत्र्याने घरात प्रवेश केला आणि झोपलेल्या बाळावर अचानक हल्ला चढवला.

कुत्र्याने बाळाच्या हाताचा चावा घेत त्याची दोन बोटे तोडली. त्यानंतर त्याच्या गालावर आणि चेहऱ्यावरही गंभीर जखमा केल्या. वेदनेने विव्हळलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच आईने घरात धाव घेतली. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाळ आणि त्याच्यावर हल्ला करणारा कुत्रा पाहून ती हादरून गेली. तिच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुत्र्याला हुसकावून लावत बाळाची सुटका केली.

जखमी बालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची प्रकृती लक्षपूर्वक तपासली जात आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला असून, परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर जुन्नरमधील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांची सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, त्यांचे निर्बीजीकरण आणि पुनर्वसन प्रभावीपणे राबवावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







