बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथे उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीशी डॉक्टरने गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी कडा शहरातील नागरिक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून, निषेध म्हणून आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत उपचारासाठी संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली होती. तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी काही कारण सांगून तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावल्याचा आरोप आहे. यावेळी तिच्या आईला बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर डॉक्टरांनी तरुणीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरांनी तिला ‘डॉक्टर नको, मित्र समज’ असे म्हणत तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने या प्रकाराला विरोध केला असता, घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर तरुणी घाबरली होती. घरी परतल्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तरुणीसोबत आष्टी पोलीस ठाणे गाठून संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती कडा शहरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपी डॉक्टराला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत नागरिक आणि ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला. शहरातील व्यापाऱ्यांनीही बंदला प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आरोपीला अटक न झाल्यास पुन्हा कडा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.







