अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने ७ सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे धर्मवीर गडाच्या जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

धर्मवीर गडाच्या जतन आणि संवर्धनासाठी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार यापूर्वी पेडगाव येथील बहादूरगडाचे अधिकृत नामकरण ‘धर्मवीर गड’ असे करण्यात आले होते. आता गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

इतिहासात या गडाला विशेष महत्त्व आहे. संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांना पेडगावच्या या गडावर आणण्यात आले होते. गडाच्या परिसरात यादवकालीन स्थापत्यकलेचे नमुने असलेली रामेश्वर, भैरवनाथ, मल्लिकार्जुन, लक्ष्मीनारायण, बाळेश्वर आणि पाताळेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाने दोन महिन्यांची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सुमारे ३ लाख ७७ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्र संरक्षित केले जाणार आहे. या क्षेत्रात प्राचीन मंदिरे, वाडे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक यांचा समावेश आहे.
दरम्यान, धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणीही आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे आता या ऐतिहासिक स्थळाच्या संवर्धन आणि विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.







