जुन्नर, (पुणे) : महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व ओतूर पोलिसांना यश आले आहे. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील 6 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून 1 गावठी पिस्टल, जिवंत काडतूस आणि इतर घातक हत्यारांसह एकूण 14 लाख 87 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनूसिंग कापूरसिंग टाक, वय 30, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉलजवळ, हडपसर, पुणे), जिलूसिंग शेरसिंग दुधानी, (वय 40, रा. सह्याद्री हॉस्पीटलचे मागे, खोपोली, शिळफाटा. जि. रायगड), करणसिंग गगनसिंग टाक (वय 27, रा. साकला प्लॉट, परभणी), पंकजसिंग काळुसिंग शिकलगार ऊर्फ दुधानी (वय 40, रा. गांधीनगर झोपडपट्टी, अंबरनाथ), पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (वय 18, रा. साकला प्लॉट, परभणी), मंगलसिंग मायासिंग दुधानी, वय 58 वर्षे, रा. झरी, जि. परभणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली एक बोलेरो जीप रविवारी (ता.12) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कोळवाडी गावच्या हद्दीत आढळून आली. वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे या वाहनाचा शोध घेत असताना, त्यांना ही जीप संशयास्पद रित्या उभी असलेली दिसली.
विघ्नेश यांनी जीपमधील संशयास्पद इसमांकडे चौकशी केली असता, त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी विघ्नेश घोलप यांनी प्रसंगावधान राखून चोर-चोरअशी जोरात आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी गोळा झाले. ग्रामस्थ आणि दरोडेखोरांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी गावकऱ्यांनी दोघा दरोडेखोरांना जागीच पकडून ठेवले, मात्र इतर चार जण गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पळून गेलेले आरोपी सराईत आणि घातक हत्यारांनी सुसज्ज असल्यामुळे पोलिसांनी मोहीम आखली. जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे येथील स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी आलमे गावच्या दुर्गम डोंगर-दऱ्यांमध्ये आणि दरी परिसरात तब्बल 6 तास सलग शोधमोहीम (कॉम्बिंग ऑपरेशन) राबवली. डोंगराच्या कोनाकोपऱ्यात शोध घेऊन पोलिसांनी पळून गेलेल्या चारही दरोडेखोरांना अखेर डोंगरदऱ्यांमधून ताब्यात घेतले.
दोन्ही राज्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेली ही टोळी सराईत असून, त्यांच्यावर महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हेदाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत एकूण 20 गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोऱ्या, 13 घरफोड्या आणि 2 वाहन चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये ओतूर (पुणे), संगमनेर, नेवासा, लोणी प्रवरा (अहिल्यानगर), आंबेजोगाई (बीड), तळोजा (नवी मुंबई) तसेच तेलंगणा राज्यातील निजामाबाद, माकलूर, निर्मल आणि आरमूर पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमोद क्षीरसागर, जुन्नरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव पोलीस अंमलदार आनंदा भवारी, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, मपोहवा संगीता मधे, रेश्मा फापाळे, पोशि मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिर्डे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नर आर. सी. पी पथक यांनी केली आहे.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी आलमे गावच्या डोंगर परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत बल्लाळवाडी, आलमे, कोळवाडी, डिंगोरे येथील नागरिक व पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य केले. पकडण्यात आलेल्या सर्व दरोडेखोरांना पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केले जात असून, या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस करत आहेत.







