Health News : उरुळी कांचन : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीमधील सर्वच भागात मागील काही दिवसांपासून पावसाळ्यातील इतर व्हायरल आजारांबरोबरच यावर्षी डोळ्यांच्या (Conjunctivitis) साथीमुळे चिंता वाढली आहे. पूर्व हवेलीत सध्या डोळे येण्याचे झपाट्याने वाढत आहे. पूर्व हवेलीत डोळ्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डोळे आल्यास गर्दीपासून दूर राहण्याचे डॉक्टरांचे आवाहन
डोळ्यांच्या आजाराबरोबरच सध्या ताप, सर्दी, खोकला आणि ‘फ्लू’चे रुग्ण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून कंपन्यांकडून ड्रॉपचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान डोळे ज्या व्हायरसमुळे येतात त्या व्हायरसचे नाव ‘इंटेरो व्हायरस’ असून, या व्हायरसचा प्रसार पूर्व हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यात वेगाने होत आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी चष्माचा वापर वाढवावा, वारंवार हाताची स्वच्छता करावी, डोळ्याला हात लावू नये व त्यातूनही डोळे आल्यास गर्दीपासून दूर रहावे असे आवाहन लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या नेत्रचिकित्सक डॉ. कल्पना खराडे यांनी केले आहे.
‘डोळे येण्याच्या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो वेगाने पसरतो. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीने गर्दीत जाऊ नये, इतरांनीही अशा व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. स्वच्छ कपड्याने डोळे साफ करावेत. हात स्वच्छ ठेवावाते. डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, डोळ्यांची आग होणे आदी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत’.
– डॉ. कल्पना खराडे, नेत्रचिकित्सक, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, (एम.बी.बी.एस. डी.एन.बी.)
डोळे येण्याचे प्रमाण वाढत असून, पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कातून हा आजार वाढत आहे. त्यामुळे डोळे आलेल्यांनी इतरांपासून दूर राहावे, स्वच्छता व डोळ्यावर चष्मा वापरावा. वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, गावठी उपचारामुळे डोळ्याला गंभीर इजा होऊ शकतात.
– डॉ. समीर ननावरे, गणराज हॉस्पिटल, उरुळी कांचन, (बी.एम.एस. एमडी. एवायु)
डोळे येणे हा आजार संसर्गजन्य आजार असल्याने हा आजार एकमेकांच्या संपर्कातून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यामुळे ज्या शाळकरी मुलांचे डोळे आले आहेत, त्यांनी त्यांच्या वर्गशिक्षकांशी संपर्क करून, डोळे बरे होईतोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेत पाठवू नये यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत जणजागृती करण्याचे काम जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे चालू आहे.
– डॉ. रुपाली बंगाळे, आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर, (ता. हवेली)
शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलावर लक्ष ठेवले जात आहे. शाळेत य़ेणाऱ्या ज्या मुलांचे डोळे दुखतात, पापण्या किंवा पापण्यावरच्या केसांवर रखरखीत थर जमा होतात अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हॉटसऍपवरून माहिती दिली जात आहे. सकाळी शाळेची प्रार्थना सुरु होण्याच्या अगोदर मुलांना डोळ्यांचे आजार व उपाययोजना याबाबत जुजबी माहिती देण्यात येत आहे. ज्या मुलांचे डोळे आले आहेत, त्यांनी त्यांच्या वर्गशिक्षकाला माहिती देऊन, डोळे पुर्ण बरे होईतोपर्यंत सुट्टी घ्यावी.
– सीताराम गवळी, प्राचार्य, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, लोणी काळभोर, (ता. हवेली)
डोळ्याची साथ कशी पसरते?
डोळ्याची साथ टॉवेल, संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने देखील साथ पसरू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती या दूषित वस्तूंना स्पर्श करते किंवा संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात येते तेव्हा संसर्ग अधिक वेगाने पसरतो.
डोळे आल्यावर चष्मा घालण्याचे फायदे –
डोळ्याची साथ आल्यानंतर चष्मा घातल्याने डोळ्यांची खाज होणे कमी होते. शिवाय, तुम्ही डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळता, त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होते. चष्मा घातल्याने धुळीचे कण डोळ्यांत जाण्यापासून रोखतात, त्यामुळे खाज येत नाही. संसर्ग अधिक पसरू नये म्हणून खबरदारी घेणे आणि योग्य स्वच्छता ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे.
डोळे आल्यास घरगुती उपाय काय?
– सुरुवातीला लक्षणे दिसताच घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याने स्वच्छ कापूस ओला करून डोळे पुसावे.
– डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. कापूर जाळून धूरी करू शकता यामुळे डोळ्यातील घाण अश्रूवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
– एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पू बाहेर पडतो
डोळे येण्याची लक्षणे?
– लाल आणि सुजलेले डोळे, पाणावलेले डोळे
– बोचरी संवेदना, खाज, जळजळ, दाह चिकटपणा जाणवतो
– पापण्या किंवा पापण्यावरच्या केसांवर रखरखीत थर जमा होतात
– डोळ्यांना सूज येते, डोळे लालसर होतात, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर पडतो
– डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखणे
– डोळ्यातून सतत पाणी येणे
– डोळ्यांना प्रकाश सहन न होणे
– डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
– दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
डोळे आल्यास करावयाच्या उपाययोजना
– डोळ्यांची स्वच्छता राखावी
– डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत
– डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा
– आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नये
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत.