आदित्य बोराटे

इंदापूर: त्याचं वय अवघं पाच वर्षाचं, तरी तो रविवारी पहाटे ५.१२ मिनिटांनी तो उठला, त्याने भक्तीभावाने नमाज अदा केला आणि सायंकाळी ६.५१ मिनटांपर्यंत त्याने ना अन्न मागितले ना पाणी. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने रोजा ठेवला आणि मग नमाज अदा करून इफ्तार केला. इतक्या छोट्या वयात अर्शान परवेज बागवान ह्याने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज पंचवीस रोजे (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १४ ते १५ तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. इंदापूर शहरातील बागवान गल्ली परिसरातील अर्शानने रोजा ठेवला आणि संपूर्ण १४ तास निर्जली राहिला, त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी २९ दिवसांचा असतो तर कधी ३० दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. यावर्षी हा पवित्र महिना 19 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.







