पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील तळवडे परिसरात दुपारी झालेल्या (Pimpri-Chinchwad Fire) भीषण आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. रुपीनगर भागात एका दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीत शेजारील भंगाराची दुकाने आणि एक खासगी बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास एका दुकानात अचानक गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी असल्यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. जवळच असलेल्या भंगार बाजारात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. त्यामुळे परिसरात मोठे आगीचे लोट आणि धुराचे ढग दिसू लागले.
या आगीत भंगार बाजाराच्या जवळ उभी असलेली एक खासगी बसही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. बस आणि भंगाराची अनेक दुकाने आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे आणि धुराचे लोट दूरवर दिसत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वेळेत नियंत्रण मिळवल्यामुळे आग इतर भागात पसरून मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार या घटनेत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आली असली तरी बस आणि भंगाराची दुकाने पूर्णपणे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे.







