बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Baramati By Election) निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामतीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Politics)

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्यामुळे राज्यभराचे लक्ष बारामतीकडे लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बारामती पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पक्षांतर्गत बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर उमेदवार न देण्याची भूमिका या पक्षाने घेतली आहे.

तरीदेखील बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्यात आल्यामुळे काही प्रमाणात धनगर समाजात नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीतून काही जण उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बारामतीप्रमाणेच राहुरीतही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही मतदारसंघांतील राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.







