Hari narke News : पुणे : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत असतानाच त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. हरी नरके यांचे मित्र लेखक संजय सोनवणी यांनी नरके यांच्यावर चुकीचे उपचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शासनाने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चुकीचे उपचार झाल्याचा गंभीर आरोप
सोनवणे यांच्या मते, हरी नरके यांना हदयाचा आजार असताना त्यांच्यावर अस्थमाचे उपचार झाले. नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार आहेत. अस्थमाचा त्रास नसतानाही त्यांच्यावर उपचार केले गेले. जामनगरला गेल्यावर त्यांना चुकीचे उपचार होत असल्याचे कळले. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि शासनाने याची चौकशी करावी, अशी मागणी संजय सोनवणी यांनी केली आहे.
दरम्यान, सोनवणी यांना हरी नरके यांनी २२ जून रोजी एक संदेश पाठवला होता. हा संदेश त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत, असे देखील संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.
संजय सोनावणी यांची फेसबुक पोस्ट
हरीभाऊंचा २२ जून २०२३ रोजी मला आलेला व्हाटस्अॅप संदेश
प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात, जामनगरला ३ आठवडे ट्रीटमेंट घेऊन पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात २० किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे २० दिवसांत २० किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी ६०-९० असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे १० महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या चौथ्या स्टेजवर आलो होतो. जास्तीत जास्त २ महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.
लीलावतीमधील नामवंत कार्डियोलॉजिस्ट, पल्मोनोलॉजिस्ट खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले. लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे. पण त्यांनी वाचलाच नाही आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो १० महिन्यांत २१ पट झाला होता. आता बरा होतोय.