लोणी काळभोर, ता. १ : पुणे शहरात विषारी दारूकांडामुळे खळबळ उडालेली असतानाच, लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-०६ यांनी संयुक्त कारवाई केली आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) यथील रामदरा रोड परिसरातील अवैध हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर रविवारी (ता. ३१) दुपारी धाड टाकून मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत हातभट्टी दारू, रसायन व रोख रकमेसह एकूण १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सुरेश रुपा बिरे (वय ६०, रा. नांदे पाटील वस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी सतिश नारायण वणवे (पोलीस अंमलदार, गुन्हे शाखा युनिट-०६) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदरा रोड येथील नांदे पाटील वस्तीजवळील एका शेतामध्ये अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-०६ व लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी रविवारी (दि. ३१) दुपारी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सुरेश बिरे याच्या ताब्यातून ३५ लिटर गावठी हातभट्टी दारू, दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे १०० लिटर रसायन आणि विक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १९ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात आरोपी मानवी आरोग्यास घातक ठरणारे रसायन वापरून हातभट्टी दारू तयार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी सदर ठिकाणाचा अड्डा जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केला आहे. तसेच आरोपी सुरेश रुपा बिरे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) व ८६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत.
“लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. हातभट्टी दारू, मटका, जुगार, गांजा तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या अवैध धंदेचालकांवर एमपीडीए (MPDA) तसेच मोक्का (MCOCA) अंतर्गत प्रस्ताव सादर करून कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अवैध धंद्यांविरोधात आमची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील.”
-राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)







