पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि महामार्गावर नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. “कमी किमतीत सोन्याची बिस्किटे देतो,” असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

ही टोळी प्रामुख्याने एकट्या असलेल्या ज्येष्ठ महिला किंवा पुरुषांना आपले लक्ष्य बनवायची. “आम्हाला खोदकामात सोन्याची बिस्किटे सापडली आहेत, आम्हाला पैशांची तातडीची गरज आहे,” असा बनाव हे गुन्हेगार रचायचे. समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेण्यासाठी ते सुरुवातीला सोन्याचा एक छोटा तुकडा तपासायला द्यायचे, जो खरा असायचा. मात्र, एकदा का समोरच्या व्यक्तीने मोठी रक्कम किंवा स्वतःचे दागिने दिले, की हे भामटे बनावट सोन्याचे बिस्किटे देऊन पसार व्हायचे.
पुणे-नाशिक महामार्गावर कळंब परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद हालचाल दिसली. सहाही जणांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी बीड आणि पाथर्डी (अहमदनगर) भागातील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.







