यवत (पुणे) : ‘आई राजा उदो उदो…’ च्या गजरात यवत येथे ग्रामदेवी श्री महालक्ष्मी माता व श्री तुकाई मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज विविध धार्मिक विधीने सुरुवात झाली. दोन्हीही मंदिरात पहाटे पारंपारीक पद्धतीने मातेची अभिषेक पूजा संपन्न झाली सकाळी १० वाजता अवचट परिवार यांच्या हस्ते तुकाई माता तर ११ वाजता दोरगे परिवाराच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिरात वाजत गाजत घट कलशाची मिरवणूक काढून विधिवत घटस्थापना करण्यात आली. आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ, देशभरात घराघरात तसेच प्रमुख देवींच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात येते. या निमित्ताने यवत येथील देवीच्या अनेक मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला.
यवत परिसरातील काळभैरवनाथ मंदिर, कळकाई माता मंदिर, काळुबाई मंदिर, शितळा देवी मंदिर यांसह अप्सरा मित्र मंडळ, दोरगेवाडी, यवत स्टेशन , मानकोबा वाडा, सहकार नगर, महालक्ष्मी नगर आधी परिसरातील मंडळांची विधिवत घटस्थापना करण्यात आली. सकाळपासूनच श्री महालक्ष्मी माता मंदिर येथून कानगाव, सोरतापवाडी, तांबेवाडी, खामगाव यांसह आजूबाजूच्या गावातील अनेक मंडळांनी ज्योत प्रज्वलित करून घेण्यासाठी गर्दी केली होती. श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्यावतीने माळसा रूपातील पूजा तर काही मंदिरात अलंकारिक आकर्षक पूजा करण्यात आली होती.