लोणी काळभोर, ता. 31 : आंतरराष्ट्रीय युद्धस्थिती आणि सोशल मीडियावरील अफवांच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या नियमांमुळे लोणी काळभोर परिसरातील हजारो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहरी भागात गॅस सिलिंडर पुन्हा बुक करण्यासाठी किमान 25 दिवसांची, तर ग्रामीण भागात 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पूर्व हवेलीतील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
शेवाळवाडी आणि मांजरी बुद्रुक ही दोन्ही गावे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असतानाही येथील गॅस पुरवठा लोणी काळभोर येथील पाषाणकर गॅस एजन्सीमार्फत होत असून ती ग्रामीण श्रेणीत येते. त्यामुळे या गावांतील ग्राहकांना शहरी भागातील सुविधा न मिळता ग्रामीण नियम लागू होत आहेत. या विसंगतीमुळे हजारो कुटुंबांना गॅस सिलिंडरसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर शहरातील ग्राहकांना तुलनेने लवकर सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
व्यावसायिक गॅस वितरण ठप्प; हॉटेल व्यवसाय धोक्यात
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण सुरळीत नसल्याने परिसरातील हॉटेल आणि खानावळींचा व्यवसाय अक्षरशः डळमळीत झाला आहे. अनेक व्यावसायिकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत असून खर्चात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही हॉटेल व्यवसायिकांना व्यावसायिक गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
लोकसंख्या लाखावर; तरीही शहरी सुविधा नाहीत
लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या दोन्ही भागांची लोकसंख्या मिळून एक लाखांहून अधिक आहे. शिवाय लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे नागरिकांचा सवाल आहे. “पोलीस, प्रशासन शहरी; पण गॅस सेवा ग्रामीण का?”
शहरासारखीच गॅस सेवा द्या
परिसरातील नागरिकांनी शासन व तेल कंपन्यांकडे मागणी केली आहे की, महानगरपालिकेत समाविष्ट गावांना शहरी श्रेणी लागू करावी. गॅस बुकिंगचा कालावधी कमी करावा. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा नियमित करावा. अन्यथा पुढील काही दिवसांत नागरिकांकडून आंदोलनही होऊ शकते.







