लोणी काळभोर, ता. २३ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये खुलेआम ‘रम्मी’ नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी धाड टाकून तिघांना 22 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि मोबाईल फोन असा तब्बल 33 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, निवासी भागातच सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तुषार विठ्ठल काळभोर (वय 43, व्यवसाय शेती, रा. कदमवाकवस्ती), राहुल पांडुरंग झेंडे (वय 40, व्यवसाय चालक, रा. फुरसुंगी) आणि प्रकाश बाबाजी इंगळे (वय 42, व्यवसाय हाऊसकिपिंग, रा. फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल अमृत रायबोले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमडीटीवर “विठ्ठल कृपा बिल्डिंग येथे काही जण पत्त्यांचा जुगार खेळत असून पोलीस मदत हवी आहे,” असा गुप्त कॉल पोलिसांना प्राप्त झाला. सदर माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने कदमवाकवस्तीतील पांडवदंड रोडवरील विठ्ठल कृपा बिल्डिंग येथे दाखल झाले.
इमारतीच्या पार्किंगमध्ये तीन जण पत्त्यांचा ‘रम्मी’ जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून वरील तिन्ही आरोपींना जागीच ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या झडतीत आरोपींकडून 3 हजार 550 रुपयांची रोख रक्कम, 52 पानी पत्त्यांचे दोन संच, तसेच विवो आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल फोन जप्त केले.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 33 हजार 550 रुपये इतकी आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.






