दौंड, (पुणे) : अज्ञात कारणावरून ७ जणांच्या टोळक्याने एका चारचाकी चालकाला कोयत्याने, लोखंडी रॉडने, दगडाने मारहाण केली. तसेच चारचाकी गाडीचे दगडाने मारून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश असून खानोटा (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील अदम शेख याचे घराजवळ सोमवारी (ता. २५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रामराजे संभाजीराव राजेभोसले (वय- २२, व्यवसाय-शेती रा. खानोटा ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुणाल विलास जाधव, विलास तुकाराम जाधव, राजेंद्र तुकाराम जाधव, विवेक राजेंद्र जाधव, आश्विनी राजेंद्र जाधव, शारदा दत्तात्रय जाधव, रूपा विलास जाधव सर्व रा. खानोटा ता. दौंड) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराजे राजेभोसले हे त्यांच्या चारचाकी गाडीतून खानोटा गावातून घराकडे निघाले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अदम शेख याचे घराजवळ आले असता, आरोपींनी राजेभोसले यांना कोयत्याने, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.
दरम्यान, याप्रकरणी राजेभोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सात जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.