पुणे: पुणे शहरात एका भोंदूबाबाच्या कृत्यांचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. राधामोहन मिश्रा नावाच्या या व्यक्तीने एका कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चशिक्षित महिलेला तब्बल १७ वर्षे आपल्या जाळ्यात अडकवून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे या बाबाचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला आहे.

हा आरोपी त्याच्या अनुयायांवर कशा प्रकारे हुकूमशाही गाजवायचा, याची माहिती तपासातून मिळाली आहे. लोकांसमोर ‘अंकलजी’ म्हणून मिरवणारा हा बाबा, खाजगीत मात्र महिलांना स्वतःला ‘महाराज’ म्हणायला लावून पाया पडायला भाग पाडत असे. अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांचे शोषण करत होता.

खराडीच्या उबाळेनगर भागात या बाबाचा १२,००० चौरस फुटांचा एक अवाढव्य बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामात त्याने भुयारी मार्ग तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. छापा टाकला असता, एका गुप्त कक्षात मोठ्या प्रमाणात संशयास्पद औषधे सापडली आहेत, ज्याचा तपास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केला जात आहे. पीडित महिलेच्या घरात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरे लावून तो तिच्या हालचालींवर २४ तास पाळत ठेवत असे. अखेर या छळाला कंटाळून महिलेने धैर्याने कॅमेरे तोडले आणि पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रासह ५ महिला दलाल आणि अन्य साथीदारांना मिळून एकूण ८ जणांना ताब्यात घेतले आहे. ही टोळी आर्थिक गैरव्यवहार कशा प्रकारे करायची आणि अजून किती महिला त्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत, याचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत.







