यवत, ता. १९ : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत हातभट्टी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त केले, देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली. सलग कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे यवत पोलिसांच्या पथकाने शेलारवाडी तळ्याजवळील ओढ्याकाठी छापा टाकला. यावेळी मेनका गंगापुत्र गुडदावत (रा. गाडामोडी, खामगाव) ही गावठी हातभट्टीसाठीचे रसायन तयार करताना आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच ती काटवणातून पळून गेली. घटनास्थळी दोन मोठ्या लोखंडी बॅरलमध्ये सुमारे दोन हजार लिटर कच्चे रसायन आढळून आले. सुमारे ७० हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रसायन नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने नानगाव येथील तारांगणा हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकून राहुल फुलचंद गुंड (वय ४९, रा. नानगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या ९५ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ८ हजार २२० रुपये असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत बाजारतळ परिसरात सुरू असलेल्या मटका व्यवसायावर दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
पहिल्या कारवाईत केविन स्टॅनली डिकॉस्टर (रा. केडगाव) याच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मटका साहित्य व रोख रक्कम असा ६ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत डी. बी. ज्वेलर्सच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून नागनाथ विश्वनाथ जाधव (रा. शालीमार चौक, दौंड) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून मटका साहित्य व रोख रक्कम असा ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.







