उरुळी कांचन, (पुणे) : आगामी नवरात्रोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या मागील तीन दिवसात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस असा 1 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संकेत गोरख चोरघे, (वय 21,रा. आंबेगाव पठार, गणेश मंदीर जवळ ता. हवेली, मुळ रा. कोळवाडी ता. वेल्हा), प्रथमेश रमेश बोऱ्हाडे (वय – 25, रा. चव्हाण मळा, पाबळ रोड, राजगुरूनगर, ता. खेड) सुनील बबन पाचपुते (वय 26, रा. चिंचोशी, ता. खेड) रोहित सहादू बटणपुरे (वय – 24, रा. बहुळ, ता. खेड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध रित्या गावठी पिस्टल, कट्टा बाळगून फिरणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या पथकाला दिले होते. त्यानुसार राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक गस्त घालीत असताना संकेत चोरघे याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुस असा एकूण 36, हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला. त्यानुसार राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील होलेवाडी बायपास येथे प्रथमेश बोऱ्हाडे व सुनील पाचपुते यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 35 हजार रुपयांचे गावठी पिस्टल जप्त केले. रविवारी (ता. 22) जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरण गावचे हद्दीतील बसस्टॉप जवळ रोहित बटणपुरे यांना ताब्यात घेवून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, “आरोपींनी पिस्टल कोठून आणले आहेत, त्याचे मुळ स्त्रोतापर्यंत जावून तपास करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदिप वारे, मंगेश थिगळे, रामदास बाबर, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, सागर नामदास, राजू मोमीण, अतुल डेरे, हेमंत विरोळे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे.