उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पाच दिवसांत तीन तरुण आणि एका अल्पवयीन मुलीसह चार जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण कार-दुचाकी अपघातात भाऊ-बहीण आणि कारचालकाचा मृत्यू झाला, तर उरुळी कांचन-आष्टापूर मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने आणखी एका तरुणाला प्राण गमवावे लागले.

अपघातांच्या या मालिकेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षा आणि बेदरकार वाहन पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उरुळी कांचन परिसरातील रस्ते वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील साखरे पेट्रोल पंप चौकात रविवारी (ता. 08) रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील नयन नितीन हजारे (वय-19) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली त्याची बहीण तन्वी नितीन हजारे (वय -16, दोघे रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) हिचा गुरुवारी (ता. 12) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कारचालक तुषार ऊर्फ अमर रोहिदास कुंजीर (वय23, रा. वळती, ता. हवेली) याचाही मृत्यू झाला.

नयन आणि तन्वी हे दोघे दुचाकीवरून (एमएच 12 एलसी 5526) सोलापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या व्हेरना कारने (एमएच 12 पीटी 9089) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारचालकाने हयगयीने वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत नयनचा जागीच मृत्यू झाला, तर तन्वी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर गुरुवारी अपयशी ठरली.

या घटनेची हळहळ कायम असतानाच गुरुवारी (ता. 12) रात्री पावणे नऊच्या सुमारास उरुळी कांचन-आष्टापूर या वर्दळीच्या मार्गावर आणखी एक अपघात झाला. रस्त्याच्या कडेला बेदरकारपणे उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक बाळू कांचन (वय अंदाजे 40, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली) यांचा जागीच मृत्यू झाला.
अवघ्या पाच दिवसांत चार जणांचा मृत्यू झाल्याने उरुळी कांचन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरील भरधाव वाहने, रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉली, ट्रक आणि इतर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, अपघातांची ही मालिका थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाय वाढवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गळीत हंगाम सुरू असताना कोणत्याही रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटरशिवाय रस्त्यावरच ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या करणाऱ्या चालकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाच्या सुस्त कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.







