पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात भररस्त्यात सोनसाखळी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. डिंग्रजवाडीच्या माजी महिला सरपंच वैशाली गव्हाणे या आपल्या मुलासह दुचाकीवरून जात असताना तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. एवढेच नाही, तर त्यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना मुलासह रस्त्यावर पाडून आरोपी पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली विकास गव्हाणे (वय ३६) या सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलाला घेऊन कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी रस्त्यावरून दुचाकीवर जात होत्या. त्यावेळी मागून एक दुचाकी वेगाने आली. त्या दुचाकीवर तीन युवक बसले होते.

दुचाकी जवळ येताच मधोमध बसलेल्या युवकाने वैशाली गव्हाणे यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण झडप घालून हिसकावले. त्यानंतर मागे बसलेल्या दुसऱ्या युवकाने त्यांच्या दुचाकीला जोराचा धक्का दिला. त्यामुळे वैशाली गव्हाणे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्या आपल्या मुलासह रस्त्यावर कोसळल्या.
घटना घडल्यानंतर तिन्ही आरोपी डिंग्रजवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेले. सुदैवाने या घटनेत आई-मुलाचा जीव वाचला. मात्र, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी वैशाली गव्हाणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नाईकडे करत आहेत.






